नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना समोर आल्या. एटीएम बदलवून फसवणूक करणे, ऑनलाईन व्यवहारात फसवणूक, बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करीत तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे वळते करणे असे प्रकार घडलेले आहेत. यासाठी नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. सोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलीस विभागाने महत्त्वाची पाऊले उचलली आहे.
लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या एका प्रकरणाचे उदाहरण देत नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
नागपूर शहरातील एका नागरिकाला मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले.तक्रारदाराच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे एक संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगून टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचे सुचवण्यात आले. तक्रारदाराने लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, त्या ग्रुपमध्ये गुंतवणुकीशी संबंधित माहिती देण्यात आली आणि 15% नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले.
सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून युपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. मात्र, पैसे पाठवल्यानंतर कुठलाही नफा मिळाला नाही तसेच आरोपींशी संपर्क करणेही शक्य झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना-
✅ अनोळखी क्रमांकांवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
✅ मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफरपासून सावध राहा.
✅ कोणत्याही अनोळखी युपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी योग्य पडताळणी करा.
✅ अशा प्रकारची कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर क्राइम हेल्पलाईन ( 1930) वर तक्रार नोंदवा.
दरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये आणि संशयास्पद क्रियाकलापांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. आपली सतर्कता हीच आपली सुरक्षितता. सजग नागरिक बना, सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहा, असे आवाहन नागपूर पोलीस विभागाने शहरातील नागरिकांना केले आहे.