नागपूर : जगभरात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. उद्या म्हणजेच शुक्रवारी साजरा करण्यात येणाऱ्या या दिवसाला खास बनविण्यासाठी बाजारपेठांमध्ये प्रेमीयुगलांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे.
आपल्या जोडीदाराप्रती प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस असल्याने आठवड्याभरापूर्वी पासूनच या उत्सवाला सुरूवात होते. त्याकरिता बाजारपेठाही ‘व्हॅलेंटाईन डे’साठी सज्ज झाल्या आहेत. रंगीबेरंगी फुले, ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट, कपड्यांच्या दुकानांसह विविध वस्तुंनी बाजारपेठाही फुलल्या आहेत.
व्हॅलेंटाइन डेसाठी देशी-विदेशी गुलाबांच्या फुलांमुळे बाजारपेठ गुलाबी रंगात रंगली असताना भेटवस्तूंची दालने प्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘लाल’ रंगाने सजल्याचे दिसते. यानिमित्ताने चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडी बेअर, संगीतमय भेटकार्ड, फोटो मग्स, हार्ट शेपमध्ये की-चेन, गॉगल्स, टोप्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अॅसेसरीज, फोटो फ्रेमसह विविध पर्याय अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. काही तरुणांनी आपला मोर्चा ऑनलाइन शॉपिंगकडे वळविला आहे. चॉकलेट बुके, केक, अॅसेसरीज, पर्स, बॅग्स, कॅफलिनमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचे छायाचित्र असे काही हटके पर्याय निवडले जात आहेत.
व्हॅलेंटाईन डे केवळ तरुण-तरुणींमध्ये साजरा केला जातो असे नाही, तर आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रिणींतील प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. मात्र, काही वर्षांपासून केवळ तरुणाईच्या वलयातच व्हॅलेंंटाईनला गुरफटून ठेवले आहे. अनेकजणांनी व्हॅलेंटाईन पार्टी, गेट टूगेदर असे कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटने व्हॅलेंटाइन कपलसाठी खास कॅण्डल लाइट डिनरच्या ऑफर्सही दिल्या आहेत.