Published On : Tue, Oct 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकर साजरी करणार ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी’

२१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन
Advertisement

नागपूर: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने यंदा नागपूरकर नागरिक ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ साजरी करणार आहेत. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ या मोहिमे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये नागपूरकर जनतेने उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाची माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

Today’s Rate
Tue 21 Oct. 2024
Gold 24 KT 78,500 /-
Gold 22 KT 73,000 /-
Silver / Kg 98,500 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभियानाबद्दल माहिती देताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमेअंतर्गत मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रभाग स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये नागरिक, नागरिक समुह, अशासकीय संस्था (एनजीओ), स्वयं सहायता समूह (SHG), शाळांचे विद्यार्थी, युथ ग्रुप यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमे अंतर्गत २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दररोज दहाही झोनमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ‘स्वच्छ दिवाळी सखोल स्वच्छता’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दहाही झोनमधील १९ दहनघाटांची स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या सर्व आरआरआर सेंटरवर दिवाळीतील सफाई मध्ये निघणारा पुनर्वापरायोग्य तसेच अन्य कचरा संकलीत करण्यात येईल. २७ ऑक्टोबर रोजी शहरातील घराघरातून कचरा संकलीत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी शहरातील महापुरूष, स्वातंत्र्य सेनानींच्या एकूण ५९ पुतळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी ‘हर घर स्वच्छता के साथ दिवाली’ या थीमसह घरोघरी दिव्यांची सजावट तसेच स्वच्छता संदेश देणारी रांगोळी काढण्यात येईल. या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील जनतेचा सहभाग असणार आहे. २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या आयईसी चमूद्वारे बाजारपेठ आणि व्यापारी संकुलाच्या परिसरात ‘व्होकल फॉर लोकल’ आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, असेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

मनपा लावणार ‘थँक यू’ स्टिकर्स

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत नागरिकांना त्यांच्या घरातील निरुपयोगी, पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू, जुने कपडे, गादी, ई-कचरा, प्लास्टिकच्या वस्तू, जुनी पुस्तके, वर्तमानत्रांची रद्दी, काचेच्या वस्तू आदी साहित्य मनपाच्या स्वीकार केंद्रावर जमा करण्याची सोय आहे. संपूर्ण शहरात मनपाद्वारे प्रभाग स्तरावर १३० कचरा स्वीकार केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवर आपल्याकडील कचऱ्याचे वेगवेगळे असे स्वतंत्र वर्गीकरण करून स्वीकार केंद्रावर जमा करावे. वर्गीकृत स्वरूपात उपरोक्त कचरा स्वीकार केंद्रावर जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्याच्या नागरिकांचे घर, सोसायटीच्या दारावर नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’चे स्टिकर्स लावण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिली. कचरा स्वीकार केंद्रामध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यापासून नवीन साहित्याची निर्मिती करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मनपाद्वारे शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली आहे. स्वीकार केंद्रावर जमा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत कचरा विशिष्ट कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात येणार आहे. यापासून संबंधित संस्थेद्वारे उपयोगी साहित्याची निर्मिती केली जाईल, असेही श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले.