Published On : Fri, Oct 11th, 2019

‘मुंबईकर’ फडणवीसांना नागपूरकर आता स्विकारणार नाहीत..! – डॉ. आशिष देशमुख

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साधी नाही. ती दोन विचारांमधील लढाई आहे. त्यातला काँग्रेसचा विचार हा सहिष्णुतेचा, लोककल्याणाचा, सामान्यांना वेठीस धरले जाणार नाही याची काळजी घेण्याचा, सामाजिक शांतता व सौहार्द टिकवण्याचा. याउलट भाजपचा विचार सत्तेचा गैरवापर करण्याचा, सामान्यांवर महागाईचे ओझे टाकण्याचा, सामान्य मतदारांना गृहित धरून व त्यांना भावनिक आव्हाने करून त्यांची मते लाटण्याचा आणि स्वतःची पोळी शेकून घेण्याचा आहे, असे प्रतिपादन काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

भाजपने जनतेला जी आश्वासने दिलीत ती पाळली नाहीत. म्हणूनच या क्षेत्रातील युवक-युवती व जनता ही भाजप आणि फडणवीसांवर कमलीची नाराज आहेत. श्री. देवेंद्र फडणवीस हे ५ वर्षापूर्वीच मुंबईकर झाले आहेत. लोकांना ते नागपूरमध्ये दिसत नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नागपूरला राहिले असते तर नागपूर शहराची सद्य परिस्थिती त्यांना कळली असती. नागपूरला वाऱ्यावर सोडणाऱ्या ‘मुंबईकर’ फडणवीसांना नागपूरकर आता स्वीकारणार नाहीत. भाजप सत्तेत आल्यानंतर लोकांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. आपला मतदारसंघ सुजाण आहे. सुशिक्षित आहे. जनतेने स्वतः विचार करून स्वतःलाच प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या भागात रोजगार निर्माण झाला काय? उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक झाली काय? नवे उद्योग आले काय? जीएसटी लागू झाल्यामुळे महागाई कमी झाली काय? मोठे उद्योजक, छोटे व्यापारी, रियल इस्टेटचे बिल्डर यांच्या बर्बादीसाठी मुख्यमंत्री जबाबदार नाहीत काय? सबका साथ, सबका विकास या नाऱ्याचे काय झाले? कालपर्यंत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हिंदू-मुस्लिम-दलित आणि इतर सारे समुदाय एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. त्यांच्यात प्रसंगी शत्रुत्व निर्माण होते. आपल्या सामाजिक सौहार्दाला, सद्भावनेला, शांततेला भाजपच्या काळात तडा गेला आहे आणि भाजपचे चुकीचे धोरण त्यासाठी कारणीभूत ठरते. राज्यघटनेने वंचितांसाठी दिलेल्या सवलतींबद्दल सवर्ण समाजाचा गैरसमज करून देण्याची मोहीम भाजपतर्फे चालवली जात आहे. तेव्हा आपण मतदार म्हणून स्वतःला आणि राज्यकर्त्यांनाही विचारले पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान केले पाहिजे, असे ते म्हणाले.

युवकांना रोजगार नाही. त्यांच्यासाठी चांगले शिक्षण देण्याच्या सोयी नाहीत. महागाईने सामान्य व गरिबांचे जगणे कठिण करून ठेवले आहे. जागतिक बाजारात पेट्रोल स्वस्त असले तरी तुमच्या खिशातून अधिकची वसुली सुरूच आहे. नागपूर महानगर पालिकेत इतकी वर्षे भाजपची सत्ता आहे. महानगर पालिकेचा एकही दवाखाना इथल्या गरिबांची धडाची सेवा करीत नाही. फक्त कर्मचारी पोसण्यासाठी आणि कंत्राटदारांना जगवण्यासाठी आरोग्य विभाग पोसला जात आहे. माझे ध्येय देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने भाजप-संघाची देशविरोधी, बहुजनविरोधी, लोककल्याणविरोधी विचारधारा पराभूत करण्याचे आहे.
दि. ११ ऑक्टोबरला जयताळा येथून प्रारंभ झालेल्या भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क साधला. तेव्हा त्यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी त्यांचेसोबत रॅलीमध्ये माजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष व माजी मंत्री श्री. रणजीतबाबू देशमुख, श्री. प्रफुल्ल गुडधे पाटील, श्री. राकेश पन्नासे, डॉ. आयुश्रीताई देशमुख व इतर वरिष्ठ नेते तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दि. १२ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता नरेंद्रनगर येथील कार्यालयातून प्रचारयात्रेला प्रारंभ होईल.

रॅलीनंतर धांडे सभागृह, गोपाल नगर येथे आयोजित सभेमध्ये डॉ. आशिष देशमुख, श्री. रणजीतबाबू देशमुख, श्रीमती रूपाताई देशमुख, श्री. विकास ठाकरे, माकपचे श्री. अरुण लाटकर इतर वरिष्ठ नेते व नागरिक सहभागी झाले होते.

श्री. विकास ठाकरे म्हणाले, कॉंग्रेसमध्ये गटबाजी नसून भाजपमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. या निवडणुकीत डॉ. आशिष देशमुख यांच्याकडून फडणवीसांचा पराभव निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

Advertisement