मनपाचे आवाहन : सर्वाधिक डेंग्यू रुग्ण ऑक्टोबरमध्ये
नागपूर : सद्या रोजच्या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूचा धोका वाढत आहे. शहरातील वातावरण लक्षात घेता डेंग्यू रुग्ण वाढू नयेत यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृतीसह घरांची तपासणीही केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात एकूण १०९८ डेंग्यू संशयीत रुग्ण आढळले यापैकी ३९५ डेंग्यू दुषित रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण ऑक्टोबर माहिन्यात असल्याची नोंद आहे. त्यामुळे डेंग्यूबाबत प्रत्येकाने जागरुकतेने घरी व परिसरात लक्ष देउन काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
डासांची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे रांजनातील पाणी, सिमेंटच्या टाकीतील पाणी, इमारतीवरील टाकीतील पाणी, परिसरातील प्लास्टिकच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर्स वा इतर कोणत्याही स्वरूपात आठ दिवसापेक्षा जास्त काळ पाणी साचलेले राहिल्यास त्यामध्ये डासअळ्यांमार्फत अंडी घातली जातात व तेथूनच डासांची पैदास वाढते. त्यामुळे नागरिकांनी घरी, परिसरात कुठेही पाणी साठवून ठेवू नये व साठलेले आढळल्यास ते खाली करून घ्यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
मनपाच्या वतीने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने शोधून कार्यक्षेत्रातील सर्व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. हिवताप व हत्तीरोग विभागातील क्षेत्र कर्मचा-यांकडून अळ्या आढळलेल्या ठिकाणी ॲबेट टाकून अळ्या नष्ट करण्यात येत असून संबंधित कामाची पुनर्तपासणी सुरू आहे. याशिवाय जनजागृती मोहिमेतून पॉम्प्लेट, पोस्टर, एफ.एम. रेडीओद्वारे नागरिकांना माहिती दिली जात आहे. प्रत्येक झोनमध्ये कार्यरत मनपाचे हिवताप व हत्तीरोग निरीक्षक, वरीष्ठ क्षेत्र कर्मचारी, हिवताप कर्मचारी, क्षेत्र कर्मचा-यांमार्फत कार्य सुरू असून जनतेला आवश्यक माहिती सांगितली जात आहे. मोकळ्या जागेत औषध फवारणीही करण्यात येत आहे. डासोत्पत्ती स्थानांमध्ये नियमती गप्पी मासे सोडली जात आहेत. मेट्रो कामगारांचे जलद ताप सर्व्हे करण्यात येते. तसेच सर्व स्तरात मनपातर्फे स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. निरुपयोगी विहीर व वाढलेल्या गवतांवरीलही अळ्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे.
शहरात ३९५ डेंग्यू रुग्ण
डेंग्यू जनजागृतीसह शहरातील नागरिकांच्या घरी व परिसराचा सर्व्हे करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे ८९ हजार ४१२ घरे तपासण्यात आली त्यापैकी ३९०० घरांमध्ये डासअळी आढळून आल्या. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये एकूण १०९८ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ६१८ संशयित रुग्णांची नोंद आहे. त्या खालोखाल सप्टेंबरमध्ये ३२४ संशयीत रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. शहरातील १०९८ संशयितांपैकी ३९५ रुग्णांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आतापर्यंत एका डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात डेंग्यूची स्थिती
व्हॉट्सॲप, ई-मेल वर नोंदवा तक्रार
खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच नागरिकांच्या डेंग्यू संदर्भात काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नोंदविता येणार आहेत. डेंग्यूबाबत तक्रार अथवा माहिती हवी असल्यास मनपाच्या 9607942809 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा vbdcomplaints.nmc@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा https://m.facebook.com/nmcngp/ या फेसबुक पेजवर आणि https://twitter.com/ngpnmc या ट्विटर पेजवर नोंदविता येईल.