– ६०० सायकलचा नियमित वापर करीत आहेत नागपूरकर,डिजिटल बुकिंग सोयीमुळे तरुणांमध्ये वाढत आहे आकर्षण
नागपूर: मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना त्यांचा संपूर्ण प्रवास सुखकर होण्याकरता महा मेट्रोतर्फे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि फिडर सर्विस सारख्या संकल्पना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत सायकल आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट तत्वावर आधारित विविध वाहनांची सेवा मेट्रो स्टेशनवर पुरवली जात आहे. या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत सुमारे ६०० सायकलचा नियमित वापर नागपूरकर करीत आहेत.
प्रवाश्यांची सुविधा हा नागपूर मेट्रोचा अंतिम उद्देश असल्याने प्रवाश्यांच्या दृष्टीने स्थानकांवर आणि प्रवाश्या दरम्यान विविध प्रकारच्या सोयी-सवलतींचे नियोजन करण्यात आले आहे. फक्त मेट्रो प्रवासादरम्यानच नाही तर घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि पुढे मेट्रो स्थानकापासून त्यांच्या अंतिम गंतव्यापर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने मल्टी मॉडेल इंटिग्रेशनद्वारा वाहतुकीच्या विविध माध्यमांचे एकीकरण करण्यात आले आहे.
ज्यामध्ये बस, इ-रिक्षा, इ-बाईक आणि सायकलची व्यवस्था महामेट्रोने प्रत्येक स्थानकावर केली आहे.याकरिता वेगवेगळ्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. विविध सेवा उपलब्ध असल्या तरी सायकलला मात्र प्रवाश्यांनी पहिली पसंती दर्शवली आहे. माय बाईक आणि व्हीआयपीएल – या दोन कंपनीशी महा मेट्रो नागपूरने सामंजस्य करार करून स्टेशनवर सायकलची सेवा पुरवण्यात येत आहे.
माय बाईक कंपनीच्या माय बाईक आणि व्हीआयपीएलच्या व्ही बाईक या दोन ऍपच्या माध्यमाने इच्छुकांना फार सुविधाजनक आणि सोप्या पद्धतीने सायकल भाडे तत्वावर घेता येते. अनेकदा तर ही प्रक्रिया कुठल्याही माणसांच्या मध्यस्थीविना केवळ अँपच्या माध्यमातून सुरक्षित रित्या करण्यात येते. डिजिटल माध्यमांचा उपयोग करणाऱ्या नागपुरातील तरुणांच्या आकर्षणाचे हे केंद्र ठरत चालले आहे.
महत्वाचे म्हणजे, सायकल भाडे तत्वावर घेताना ती तासभरासाठी, एक दिवसासाठी किंवा संपूर्ण महिन्याकरता देखील घेता येते. यासाठी लागणारी फी अत्यंत परवडण्यासारखी असून हे सर्व व्यवहार कुठल्याही अडथळ्याशिवाय ऍपच्या माध्यमाने होतात. या नागपूरकरांनी आता पर्यंत दोन कंपनीतर्फे सुमारे ६०० च्या वर दुचाकी सायकल भाड्याने घेतल्या असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.
मेट्रो ट्रेन मधून प्रवास करताना सायकल सोबत नेता येऊ शकल्याने देखील हि सोय नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या सोयीचा लाभ घेत सायकलचा वापर येत्या काळात अधिक होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दुचाकी वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्याकरता आणि आरोग्य उत्तम राखण्याकरिता सायकल प्रवास आणि मेट्रो उत्तम पर्याय असल्याचे आता डॉक्टरांनीही मान्य केले आहे. या सगळ्यांचा विचार करून सायकल आणि मेट्रो ट्रेनच्या माध्यमाने नागपूरकरांनी प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रो नागपूरतर्फे करण्यात येत आहे.