नागपूर : शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसंदिवस वाढतच चालल्या आहेत. नागपूरच्या दिघोरी चौकात गुरुवारी दुपारी भरधाव वेगात असलेल्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
४८ वर्षीय सीमा शरद ढोरे असे मृत महिलेचे नाव असून, दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंगसाजी नगर येथील रहिवासी असलेले हे जोडपे हिरो पॅशन प्लस मोटारसायकलवरून (एमएच-३१/बीएस-५३९८) जात असताना उमरेड रोडवरील जुना दिघोरी बसस्थानकाजवळ बसने (एमएच-४०/वाय-६७३४) त्यांना धडक दिली. हा अपघात होताच बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सीमा ढोरे यांना यश हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे रात्री ८.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यांचे पती शरद योगेश ढोरे (५३) याच रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सीमाचा मेहुणा सतीश ढोरे (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाठोडा पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.