नागपूर : मेडिकलशी संलग्नित बी. एस्सी. नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थिनीचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. निकृष्ट दर्जाची पाणीपुरी खाल्ल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आले.
शीतल राजकुमार (१८) असे विद्यार्थिनीचे नाव होते. शीतलला बरे नसल्याने तिच्या तोंडाला चव नव्हती. तिने एक प्लेट पाणीपुरी घेतली, परंतु अर्धीच खाल्ली. इतर पाणीपुरी तिच्या मैत्रिणीनेच खाल्ल्या. त्यानंतर शीतलची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकलला दाखल केले. येथे ६ जुलैच्या रात्री तिचा मृत्यू झाला.मात्र तिच्यामृत्यूबाबत मेडिकलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) या विद्यार्थिनीचे वैद्यकीय अहवालही दिले जात नसल्याने मेडिकलकडून काही तरी दिरंगाई होत असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.शीतल आजारी पडल्यावर तिच्या रक्ताचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यात विषमज्वरचे निदान झाल्याचा अहवाल एफडीएला मिळाला. रुग्णाच्या शरीरात विषमज्वरची बाधा होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागतो. हा आजार तिला आधीच झाल्याची शक्यता आहे. हा अहवाल उपचाराच्या कागदपत्रात नसल्याची माहिती समोर येत या आहे.