नागपूर : उत्तराखंडमध्ये सुरू झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपराजधानी नागपूर येथील धावपटू नेहा डबाले हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ४०० मीटर शर्यतीत तिने कांस्यपदक जिंकले. तर तामिळनाडूच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.
उत्तराखंडमध्ये ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जे २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले. जिथे २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (SSCB) मधील खेळाडू ३२ वेगवेगळ्या खेळांमध्ये पदकांसाठी खेळत आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून नागपूरच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला. ४०० मीटर हर्डल्स शर्यतीचा अंतिम सामना देहरादूनमधील गंगा अॅथलेटिक्स मैदानावर झाला. ज्यामध्ये शहरातील खेळाडू नेहा डबाले हीने चमकदार कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले.
नेहाने अंतिम फेरीत १:००.५५ मिनिटांत शर्यत पूर्ण केली आणि कांस्यपदक आपल्या नावी केले. तामिळनाडूच्या विथ्या रामराज आणि श्रीवर्थानी एसके यांनी अनुक्रमे ५८.११ आणि ५९.८६ वेळ नोंदवून सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.