नागपूर : मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता वाधवानी यांच्याशी संबंधित व्यापाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आयकर विभाग वाधवानी यांच्या इतवारी येथील लॉकर्सचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर नजर ठेवून आहे. या अंतर्गत गुरुवारी अशा जवळपास १५ व्यापाऱ्यांची आयकर विभागाने कसून विचारपूस केल्याची माहिती आहे.
दुसरीकडे इतवारी-मस्कासाथ येथील संबंधित सुपारी व्यापाऱ्यांसह वाधवानी यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रान्सपोर्टरही आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या काही दिवसात सुपारी व्यावसायिक आणि ट्रान्सपोर्टरवरही आयकर विभागाची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॅप्टन नावाने कुख्यात असलेला सुपारी व्यावसायिकही यानिमित्ताने तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.
मध्य भारतातील सर्वात मोठा सडक्या सुपारीचा व्यावसायिक म्हणून कॅप्टन कुख्यात आहे. तो नागपुरातून विविध प्रांतात सडलेल्या सुपारीवर प्रक्रिया करून ती घातक सुपारी वेगवेगळ्या राज्यात विकायला पाठवतो.
त्याला त्याची कुणकुण लागल्याने त्याने गेल्या दोन दिवसात करोडो रुपयांची सडकी सुपारी आणि कोट्यवधीचा अन्य माल इकडे-तिकडे केल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे. पोलिसांनीही त्याच्याकडे लक्ष वेधले आहे. यासोबतच अन्य निकृष्ट सुपारी व्यावसायिकांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. प्रत्येकजण आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी धावपळ करीत आहे. गुरुवारीसुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश वाधवानी यांची विचारपूस केली.