नागपूर : समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण करत नागपुरातील एका हवालदाराने अवयवदानातून चार कुटुंबाना मोठा आधार दिला आहे. काटोल रोड येथील पोलीस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत किशोर तिजारेंचा (४५) असे त्या दानवान व्यक्तीचे नाव . एका अपघातामुळे त्यांचा मेंदूमृत झाला. किशोर तिजारे यांच्या पत्नीचे नाव सपना आहे. त्यांना खुशी (१२), हिमांशी (१०), मितांश (७) असे तिन मुले आहेत.
माहितीनुसार, ८ ऑगस्टला किशोर तिजारे हे कार्यालयाच्या काही कामासाठी गिट्टीखदान चौकातून संध्याकाळी ७.३० वाजता दुचाकीवर जात असताना त्यांना भीषण अपघाताला तोंड द्यावे लागले. या अपघातात किशोर यांच्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना उपचारादरम्यान त्यांचा मेंदूमृत असल्याचे कळाले.
न्यू ईरा रुग्णालयातील डॉक्टरांसह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून अवयवदानाबाबत समुपदेशन केले गेले. कुटुंबीयांनी संमती दर्शवताच या रुग्णाच्या अवयवांशी गुणसूत्र जुडणाऱ्या रुग्णाचा शोध सुरू झाला. शेवटी गुरुवारी (१० ऑगस्ट) एक मूत्रपिंड ४७ वर्षीय न्यू ईरा रुग्णालयातील प्रतीक्षा यादीतील रुग्ण दुसरा मूत्रपिंड ३० वर्षीय केअर रुग्णालयातील रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले. तर दोन्ही बुब्बुळ महात्मे आय बँकेला दिले गेले. त्यामुळे पुढे या बुब्बुळाचे दोन रुग्णात प्रत्यारोपण होऊन तेही हे सुंदर जग बघू शकणार आहे. परंतु तांत्रिक कारणाने यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले नाही.
दरम्यान मृत पोलीस हवालदार किशोर तिजारे यांनी जिवंत असताना आपले कर्तव्य तर पार पाडलेच मात्र मृत्यूनंतरही त्यांनी मोलाची समाजसेवा केल्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सर्व स्तरावर कौतुक कारण्यातबा येत आहे.