नागपूर/दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणार्या इलेक्ट्रिक वाहनाचा शुभारंभ करण्यात आला. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाने विकसित केलेले हायड्रोजन फ्यूएल सेल इलेक्ट्रिक वाहन टोयोटा या कंपनीने तयार केले आहे.
या शुभारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय मंत्री आर. के. सिंग, केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, टोयोटा किलोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाजू योशिमुर, टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.
टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी जगातील सर्वात प्रगत इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन टोयोटा मिराईचा हायड्रोजनवर चालणार्या वाहनाचा अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट आयोजित करीत आहे. भारतीय रस्ते आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन हे वाहन वापरता येईल.
हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश ग्रीन हायड्रोजन आणि इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या अद्वितीय उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करून देशातील ग्रीन हायड्रोजनवर आधारित इकोसिस्टिम तयार करणे हा आहे. हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण रक्षणास हा प्रकल्प प्रोत्साहन देईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्राला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्नही होत आहे.
हायड्रोजनद्वारे चालविण्यात येणारे इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन शून्य कार्बन उत्सर्जन करणारे वाहन असून पर्यावरणास अनुकूल आहे. पाण्याशिवाय अन्य कोणतेही उत्सर्जन या वाहनातून होत नाही. ग्रीन हायड्रोजन हा अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो. हे इंधन भारतासाठी परवडणारे आणि पर्यावरणाचे रक्षण करणारे ठरेल असा विश्वासही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.