नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी प्रशासकीय इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.४) लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फीत कापून हिरकणी कक्षाचे लोकार्पण केले. इस्टोरीया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सतर्फे सी.एस.आर. निधीतून मनपा मुख्यालयात कक्ष उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये महिलांसाठी त्यांच्या बाळांना स्तनपान करण्याची सुविधा दिली आहे. त्याचप्रमाणे सदर कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था, टेबल टॉप, आरसा तसेच अन्य सुविधा देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कक्षाचे निरीक्षण करून महिलांसाठी चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांचा हस्ते इस्टोरीया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे हर्षवर्धन नागपुरे, सचिन नागपुरे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कक्षाची संकल्पना स्मार्ट सिटीचे नियोजन विभाग प्रमुख राहुल पांडे आणि त्यांच्या सहकारी अमित शिरपुरकर, स्वप्निल सावलकर आहे. विशेष म्हणजे, शासकीय / निमशासकीय कार्यालयांत नागपूर स्मार्ट सिटी तर्फे देशात पहिल्यांदाच याप्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी स्मार्ट सिटीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.