प्रशासनाद्वारे शासनाला विनंती करण्याचे महापौरांचे निर्देश
नागपूर : नागपूर शहरातील अंबाझरी उद्यानालगतचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मनपा सभागृहाच्या परवानगीविना तोडण्यात आले. याचे तीव्र पडसाद मनपा सभागृहात गुरुवारी (ता.२२) सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. यावर सभागृहाची भावना लक्षात घेता महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबद्दल मनपा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाला नागरिकांची व नगरसेवकांची भावना कळवावी आणि तेथील प्रस्तावित वास्तूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी विनंती करावी, असे निर्देश दिले.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आंबेडकर भवन तोडण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, अंबाझरी उद्यानाची ४४ एकर जागा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शासनाला हस्तांतरित करण्यात आली होती. नंतर ही जागा शासनाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला दिली. याचे नियोजन प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास आहे. याबद्दल आता मनपा कोणतीही कारवाई करु शकत नसल्याचे प्रशासनाद्वारे निवेदन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी अंबाझरी उद्यान महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित झाल्यानंतरही उद्यानावर मनपाकडून निधी खर्च करण्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. या विषयाची संपूर्ण माहिती शासनाला देण्यात यावी. तसेच शासनाला जागा दिल्यानंतरही मनपातर्फे खर्च करण्याबद्दल प्रशासनाने लेखी माहिती महापौर कार्यालयात सादर करावी, असे निर्देश यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
एवीजी – बीवीजी वर निगराणी ठेवण्यासाठी ए.आय.चा वापर करावा : महापौर
नागपूर शहरातील कचरा संकलन व्यवस्थापनासाठी नियुक्त एजी एन्व्हायरो आणि बी.व्ही.जी. या दोन्ही कंपन्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून निगराणी ठेवण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले. ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी याविषयावर चर्चा उपस्थित केली होती.
महापौरांनी निर्देश दिले की, दोन्ही कंपन्यांच्या वाहनांवर जीपीएस सिस्टीम लावण्यात आले आहे. याचे ॲक्सेस महापौर कार्यालयात सुद्धा देण्यात आले आहे. परंतू याबद्दल विभागाला सुद्धा योग्य माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रत्येक घरावर बारकोड लावून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे महापौरांनी निर्देश दिले.
नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीबद्दल विकास कामांना लवकर मंजूर द्यावी : महापौरांचे निर्देश
नगरसेवकांच्या स्वेच्छानिधी बद्दलच्या विकास कामांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्वसाधारण सभेत दुर्बल घटक निधी बद्दल विचारलेल्या प्रश्नाबद्दल प्रशासनाला दिले.
स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात बांधील खर्च व जुणे देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सर्व विभागाकडून माहिती घेऊन बजेट तयार करण्यात आले असल्यामुळे मंजुरी देण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी मागच्या वर्षीचा अखर्चित निधी पुढच्या वर्षी खर्च करण्याची सूचना केली. याबद्दल प्रशासनाने माहिती दिली. विजय झलके यांनी वित्त विभागाकडून परिपत्रक काढल्याने नगरसेवकांच्या फाईल्स होत असलेल्या विलंबा बद्दल विचारणा केली.
मनपा आयुक्तांनी आपल्या निवेदनात सांगितले की, दुर्बल घटकासाठी निधी उपलब्ध आहे. यावर्षी समितीने प्रस्ताव तयार करावे. मागील वर्षीच्या निधी बाबतीत अभ्यास करून उत्तर दिले जाईल.