Published On : Tue, Feb 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण’ झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6 हजार रुपये वितरीत करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासन या निधीत 3 हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9 हजार आणि केंद्रशासनाचे 6 हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘जलयुक्त शिवार योजना’ आणली त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. केंद्र शासनाकडून ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ मंजूर करून घेतली. या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कृषी औजार, शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 6 हजार कोटींच्या खर्चातून या योजनेंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रेडींग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी ‘स्मार्ट योजना’ आणली असून त्याचा बहुतांश शेतकरी लाभ घेवून विकास साधत आहेत. ॲग्रीस्टॅक ही महत्वाची योजना हाती घेण्यात आली आहे. याद्वारे संपूर्ण शेतीचे डिजीटायजेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देण्यात येणार आहे. मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याला लाभ मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत ॲग्रीस्टॅक अंतर्गत 54 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच 100 टक्केचे उद्दीष्ट गाठण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील 1 वर्षात 1 लाख शेतकऱ्यांना याअंतर्गत सौरपंप देण्यात आले आहेत. सौरपंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 25 वर्षात वीज बिलाची चिंता नसणार असे त्यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात 150 पेक्षा जास्त सिंचन योजनांना फेर प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भातील शेतीचे चित्र बदलणारा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गोसेखुर्द धरणातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वैनगंगा नदीद्वारे 550 कि.मी. पर्यंत पाणी वाहून नेत बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीपर्यंत घेवून जाण्यात येणार आहे. याद्वारे नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा अशा एकूण 7 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी भागाला याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाद्वारे 10 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येणार व याद्वारे मोठे परिवर्तन घडेल, असेही त्यांनी सांगितले. ड्रोन दीदी योजनेद्वारे महिलांना प्रशिक्षण देवून ड्रोनद्वारे शेतीत फवारणी करण्याचा अभिनव प्रकल्पही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीराज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. पीएम ‘किसान सन्मान निधी’ व ‘नमो किसान सन्मान’ निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी व शेतीच्या विकासासाठी कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 22 हजार कोटी रूपये आज देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात आले. राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 1 हजार 967 कोटी रूपये थेट वितरीत झाले आहेत. मागील सहा वर्षात पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील 3.7 लाख कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आले. तर राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांमध्ये 33 हजार 565 कोटींचा लाभ जमा झाला आहे.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वनामती परिसरातील कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनीला भेट देवून विविध स्टॉलची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

Advertisement