नागपूर : शहरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. हे पाहता नागपुरात सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळ्यादरम्यान ‘स्टार्टअप एक्सपो’ ही भरविण्यात येणार आहे. एकाच वेळी ५ हजार तरुण बसू शकतील अशी व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली आहे.