नागपूर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा कारण्यात्त सुरूवात केली आहे. यातच जागावाटपा वरून काँग्रेस आणि ठाकरे गट वाद पेटल्याची माहिती समोर येत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाष्य केले.
नागपूर विभागात ठाकरे गटाला १ जागा मिळाली त्यावरून नाराजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळालं नाही असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे, असे पटोले म्हणाले आहेत.ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तिकिट वाटपानंतर काही नाराज होतील. हा प्रक्रियेचा भाग आहे. महाराष्ट्र मोठा आहे. ३ पक्षांची आघाडी आहे. मित्रपक्ष आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात एखाद्या पक्षाला जागा मिळणार नाहीत. जवळपास १०-१२ जिल्ह्यात आम्ही उमेदवार दिले नाहीत.
संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु महाराष्ट्र वाचवणे हे दायित्व जास्त आहे. महाराष्ट्र महायुतीच्या हातात गेला तर पूर्ण महाराष्ट्र विकून गुजरातचं नियंत्रण महाराष्ट्रावर आले असं होईल , असेही पटोले म्हणाले. सांगलीसारखा पॅटर्न कुठे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. काही जागांचा वाद आहे तो उद्यापर्यंत संपेल. सगळ्या समाजाला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न झालेला असल्याचेही पटोले म्हणाले.