मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (१९ एप्रिल) सुरुवात होत आहे. मात्र अद्यापही महायुतीने अनेक जागांवर आपले उमेदवार घोषित केले नाही. महायुतीने अगदी शेवटच्या क्षणाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवार घोषित केला.
मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ही जागा संयुक्त शिवसेनेने लढवली होती. शिवसेनेचे विनायक राऊत दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून जिंकले होते. हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला.
मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदय सामंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केले. तसेच या निवडणुकीत आम्ही राणेंचा प्रचार करू, आम्ही नाराज नाही, असे ते सामंत बंधू म्हणाले आहेत.