नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असे सूचक वक्तव्य केले. यावर आता खुद्द फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
उत्तराधिकारी शोधणे ही मुघलांची संस्कृती –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही-
राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्दा चांगलाच तापला आहे.यावर फडणवीस यांनी रोखठोक भाष्य केले. कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. मला असं वाटतं की, ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे. त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे, हा आग्रह असणं चुकीचे नाही. फक्त कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल, असे फडणवीस म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या ‘त्या’ विधानावर सडेतोड प्रत्युत्तर –
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच नवीन शिक्षण पद्धतीवर निशाणा साधला. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी सोनिया गांधींच्या सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या भारत शिक्षण पद्धतीचे भारतीयकरण होणे यात कुठलाही गैरप्रकार नाही. लॉर्ड मेकाले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षण पद्धती आणली होती. त्यामुळे ती आम्हाला कदापी मान्य नाही असे फडणवीस म्हणाले.