संजीवन सोशिओ मेडिकल फाऊंडेशन संचालित संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्र आमगाव (देवळी) हिंगणा नागपूर यांच्यावतीने सातव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त पाच दिवसीय निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सामाजिक कार्यकर्त्या अॅड. गौरी चांद्रायण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात प्रामुख्याने मेडीकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. हरिभाऊ कानडे, आयुर्वेदाचार्य डॉ. श्रीमती कानडे, होमियोपॅथ डॉ. ज्योती अग्रवाल, नेत्ररोग तज्ञ डॉ. आकांक्षा अग्रवाल, पॅथालॉजिस्ट डॉ. सिध्दम अशा सर्व पॅथीच्या तज्ञांनी सहभाग नोंदवला व निसर्गोपचाराचा लाभ घेतला.
शरीर शुद्धीसाठी एनीमा, मसाज, मड बाथ, स्टीम बाथ, जीएच पॅक, किडनी पॅक, ऑस्टियोपॅथी, फिजियोथेरपी, योग, मेडिटेशन अशा उपचारांचा शिबिरात वापर केला गेला. डॉ. मानधाता विश्वकर्मा यांनी सहभागींना जीवनशैली निरोगी करण्यासाठी आवश्यक बदल आणि नैसर्गिक घरगुती उपचारांबाबत समुपदेशन केले. संजीवन निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉ. संजय उगेमुगे यांनी प्रास्ताविकातून संजीवन निसर्गोपचार व योग केंद्राला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. या दोन वर्षात 5800 व्यक्तींवर नॅचरोपॅथीचे उपचार केले गेले असून त्यांना व्याधीमुक्त करण्यात आले, असे ते म्हणाले.
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा होते तर डॉ. राखी खेडीकर यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. कानडे यांनी अनुभव कथन करताना संजीवन निसर्गोपचार केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
हे विदर्भातील निसर्गोपचाराचे उत्कृष्ट केंद्र असून येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत असे ते म्हणाले. निसर्गोपचारामुळे त्यांना झालेले फायदे सांगताना त्यांनी सर्वांनी निसर्गोपचाराकडे वळावे, असे आवाहन केले. यावेळी नॅचरोपॅथी केंद्रात सेवा देणारे डॉक्टर व थेरपिस्टचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. विश्वकर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.