नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाने मुली व मुलांच्या गटात सर्वाधिक पदकांची कमाई करीत विजेतेपदाचे दुहेरी मुकुट आपल्या नावे केले आहे.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे बुधवारी (ता.24) कराटे स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 14 वर्षावरील वयोगटात नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (एनएसकेए) मुलींच्या गटात 111 तर मुलांच्या गटात 204 अशी सर्वाधिक पदकांची कमाई करीत स्पर्धेत ‘चॅम्पियन’ ठरला आहे. मुलींच्या गटात एनएसकेए ने 21 सुवर्ण, 9 रौप्य आणि 30 रौप्य पदक पटकाविले. तर मुलांमध्ये एनएसकेए ने 35 सुवर्ण, 27 रौप्य आणि 45 कांस्य पदकांची कमाई केली आहे.
मुलींच्या गटामध्ये मित्सुया-काई-हयासी-हा शितो–रियू कराटे-डो इंडिया संघाने 8 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 62 पदकांची कमाई करीत दुसरे स्थान प्राप्त केले. तर ॲमेच्योर ट्रॅडिशनल कराटे असोसिएशन नागपूर ने 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 12 कांस्य असे एकूण 44 पदक प्राप्त करीत तिसरे स्थान राखले.
मुलांच्या स्पर्धेमध्ये अरेना स्पोर्ट्स यूनिव्हर्स ॲकेडमीने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 63 पदकांच्या कमाईसह दुसरे स्थान मिळविले. तर मित्सुया-काई-हयासी-हा शितो–रियू कराटे-डो इंडिया ने 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 33 कांस्य अशा एकूण 57 पदकांसह तिसरे स्थान प्राप्त केले.
सर्व वयोगटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर विजेते ठरलेल्या नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया संघाला विजेतेपदाचे चषक प्रदान करण्यात आले.