नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा ओबीसींचा शत्रू असल्याचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ओबीसींना वेठीस धरले आहे. नागपुरात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले.
मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यादरम्यान ओबीसी समाजासाठी कोणतीच घोषणा केली नाही. आजपपर्यंत राष्ट्रवादीने ओबीसींच्या एकही नेत्याला मोठे पद दिले नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. मात्र दुसरीकडे भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. पक्षाने त्यांना पंतप्रधान पदावर बसविले. तर राष्ट्रवादीने ओबीसीच्या नेत्याला साधे अध्यक्षपद सुद्धा दिले नाही, असे बनवकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला ओबीसी समाजाची निवडणुकीपूर्वी आठवण येत असते. राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर ही केवळ नौंटकी असून 2024 च्या निवडणुकीपूर्वी पक्षाचा खोटेपणा जनतेला दिसत आहे.
भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.पक्षाच्या नेत्यांनी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना येत्या निवडणुकासोबत लढणार आहेत. आम्ही शिंदे यांच्या उमेदवाराचा प्रचार करून त्याला बहुमताने निवडून आणणार आहोत,असेही बावनकुळे म्हणाले. भाजपचे विधानसभेसाठी २८८ आणि लोकसभासाठी ४८ जागांचे लक्ष्य असून यासाठी आम्ही जनतेचा विश्वास जिकंण्याचे प्रयत्न करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.