नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयात आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने राणांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविले असून त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती.
तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला. आज याप्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला.