नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनी सत्तेत सामील होत शिंदे गट आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक नेतेही महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत असणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, नवाब मलिक यांनी देखील आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त दाखल झाल्यानंतर मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नवाब मलिक विधान भवन परिसरात आल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेले. ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कक्षात बसले होते.मी राष्ट्रवादी मध्ये आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्याकाळात विधानभवनात राजकीय मुद्द्यावर बोलणार नाही.
माझ्या मतदार संघाच्या समस्या सभागृहात मांडणार असल्याचे ते प्रसार माध्यमांना म्हणाले. तसेच आमच्यात कोणतीही फाटाफूट नाही आम्ही एकच आहोत. दरम्यान मलिक यांना विधानसभेतील सत्ताधारी बाकांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले होते. यावरून त्यांनी सत्ताधारी अजित पवार गटाला समर्थन दिले हे स्पष्ट झाले आहे.