नागपूर :राज्याच्या उपराजधानीत महिला आणि मुलींसोबत अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशने नागपूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
ऑरेंज सिटी प्रॉडक्शन निर्मित आणि शहर पोलिसांच्या सहकार्याने तयार केलेला “नई सोच 112 ” हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. महिला सुरक्षेबद्दल आणि आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 बद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पोलिस विभाग, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी जागरूकतेच्या दिशेने एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले आहे.
नागपूर पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित झाला. डॉ. रवींद्र सिंगल (पोलीस आयुक्त, नागपूर शहर), निसार तांबोळी (सह पोलिस आयुक्त, नागपूर शहर) आणि संजय पाटील (अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर) यांनी चित्रपटाचे अनावरण केले.
चित्रपटाच्या मुख्य टीममध्ये सतीश मोहोड (निर्माता), निखिल वसंतराव शिरभाते (लेखक आणि दिग्दर्शक), मोहना रामटेके (मुख्य भूमिका) आणि समर शुक्ला, हर्षल चांदेकर, प्रज्वल भोयर, पवन काळभेदे, कपिल परागे, रूपाली मोरे, स्वप्नील भोंगाडे आणि नागपूर शहर पोलिसांची टीम यांचा समावेश आहे.
हेल्पलाईन क्रमांक 112 बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश –
डायल 112 बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, तरुणांनाही या हेल्पलाइनचा योग्य वापर समजावा यासाठी पोलीस विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा चित्रपट दाखविण्याची योजना आखली आहे. “नई सोच 112 ” हा केवळ एक चित्रपट नाही तर एक सामाजिक संदेश आहे.