मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील वादामुळे कुर्ला येथे मिठी नदीच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
संरक्षक भिंतीसाठी पायलिंग करण्यात आले त्यावेळचे दगड, विटा, माती तशीच पडून आहे. २०१२ पासून एमएमआरडीएने संरक्षक भिंतीसाठी निर्माण केलेले राबिट तसेच पडून असल्याने मिठी नदीचा काठ सिमेंट-कॉंक्रिटसारखा झाला आहे. हा ढिगारा हटवावा याबाबत वारंवार मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु त्याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करण्यात आला. यामुळे पावसाळयात मुलांच्या आणि पाणी तुंबले तर नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो यासाठी कुर्ल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी पालिकेला एक आठवडयाची मुदत दिली होती मात्र तरीही पालिकेने लक्ष दिले नसल्याने डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
यावेळी माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही भेटण्यास आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याचीही घटना यावेळी घडली. नगरसेविका सईदा खान यांच्यासमवेत या ठिय्या आंदोलनामध्ये नगरसेवक कप्तान मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.