नागपूर/भंडारा: भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेतकरी विरोधी असल्याचा प्रत्यय नुकताच आला. किडीग्रस्त शेतकर्यांच्या पिकाच्या नुकसानीबद्दल मदत वाटपासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेऊन वाटपाला विरोध केला आहे. हे त्यांचे शेतकरी विरोधी कृत्य असल्याची टीका भाजपाचे साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी एका पत्रपरिषदेत केली. शेतकर्यांना तुडतुड्यांच्या नुकसानापोटी घोषित करण्यात आलेली मदत वाटप करण्यात यावी, यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांना भेटले असून एक निवेदन त्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या 23 फेब्रुवारी आणि 17 मार्च रोजी शासनाने कीडीने प्रभावित कापूस आणि धान उत्पादक शेतकर्यांना मदतीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने मदतीचे वाटप करण्यात येत आहे. 8 मे रोजी मदत वाटप करण्याचे निर्देश शासनाने एका परिपत्रकान्वये प्रशासनाला दिले. पण शेतकरीविरोधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला.
तुडतुडे, मावा या किडीने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांचा मदतीचे आश्वासन विधानसभा सभागृहात शासनाने दिले होते. त्यानंतर शासनाने मदतीचा निर्णय घेतला. भंडारा जिल्ह्यात 67 कोटी 72 लाख रुपयांची शेतकर्यांना मदत शासनाकडून मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्यांना 41.50 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.
लोकसभा पोटनिवडणूक भंडारा गोंदिया मतदारसंघात आहे. शासनाने किडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतला आहे. त्यावेळी भंडारा गोंदियाची निवडणूक लागली नव्हती. शासनाने या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकर्यांना सर्व स्तरावर मदत केली आहे. यापुढेही करणारच आहे. 34 हजार कोटींची कर्जमुक्ती दिली. पीक कर्ज शेतकर्यांना उपलब्ध करून दिले किडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा निर्णय घेतला, याकडेही आ. काशीवार यांनी लक्ष वेधले.
शेतकर्यांना होणार्या पीक नुकसानीची मदत वाटप निवडणुकीच्या आचारसंहितेत येत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार या कामासाठी आचारसंहिता लागू होत नाही. तसेच खरीप पिकासाठी पेरणी करण्यापूर्वी शेतकर्यांना मदत मिळण्याची आवश्यकता आहे. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे कापूस व धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नवीन पिकाच्या तयारीसाठी शेतकर्यांना मदत मिळणे आवश्यक आहे.
शेतकर्यांना देण्यात येणार्या मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकर्यांची यादी यापूर्वीच तयार असून शेतकर्यांचे बँकांमध्ये खातेही काढण्यात आले आहेत. 17 मार्च रोजी शासनाने मदत वाटपाचा निर्णय घेतला होता. आचारसंहितेपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे या मदतीचे वाटप होऊ शकलेले नाही. म्हणून शेतकर्यांच्या या मदतीचे वाटप त्वरित सुरु करावे अशी मागणीही आ.काशीवार यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली आहे. या वाटपाचा आचारसंहितेशी सूतराम संबंध येत नसल्याचेही ते म्हणाले.
शासनाने शेतकर्याप्रती घेतलेले सकारात्मक निर्णय पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. म्हणूनच शेतकर्यांच्या मदत वाटपावर ते आक्षेप घेत आहे, असेही आ. काशीवार म्हणाले. पत्रपरिषदेला भाजपनेते व नगराध्यक्ष सुनील मेंढे उपस्थित होते.