मुंबई : शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करणार आहेत.नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निकाल जाहीर करावा लागणार आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर त्यांचा निर्णय जाहीर करतील.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलेलं आहे. राहुल नार्वेकर त्यांच्या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा संदर्भ घेतात का हे पाहावे लागणार आहे. तसेच हा निकाल नेमका अजित पवार गट आणि शरद पवार गटापैकी नेमका कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत फूट पाडली. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे.