मुंबई: महाराष्ट्रातील युवकांची ताकद उभी राहिली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळयात मोठा पक्ष म्हणून होवू शकतो. त्यामुळे मेहनत घ्या पक्ष सत्तेवर येईल असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवकांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
आज राज्याच्या युवक प्रदेशची आढावा बैठक मुंबईच्या पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी आत्मविश्वास व्यक्त करतानाच जो पक्षाचे काम करणार नाही त्याने आत्ताच सांगा कोण कुणासाठी थांबणार नाही. येत्या दोन महिन्यात म्हणजेच १० जुलैपर्यंत ९१ हजार ४०० बुथ तयार करा आणि संघटना मजबुत करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.
या बुथ कमिटयांमध्ये किंवा जिल्हयाच्या आणि तालुक्याच्या कमिटीमध्ये सर्वसमाजाच्या युवकांना आणि लोकांना समाविष्ट करुन घेण्याबाबतही सांगितले. येत्या काळात युवकांची भक्कम फळी बांधतानाच विभाग, जिल्हा, तालुकापातळीवर युवकांची शिबीरे घेणार असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली. याशिवाय या बैठकीमध्ये अनेक गोष्टींवर युवकांना मार्गदर्शनही केले.
या बैठकीमध्ये युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनीही युवक संघटनेच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी अनेक युवक जिल्हाध्यक्षांनी संघटना वाढीसाठी काय करायला हवे याबाबतची माहिती दिली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाचे खजिनदार आमदार हेमंत टकले, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, प्रदेशचे नेते अविनाश आदिक,युवक प्रदेश उपाध्यक्ष रविकांत वरपे,युवक प्रदेश सरचिटणीस अभिषेक बोके, प्रवक्ते महेश तपासे, युवकचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण आदींसह राज्यातील युवकचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.