सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात ६० डॉक्टरांच्या ६ टीम रवाना
डॉक्टरांच्या आणखी टीम त्या-त्या भागात सहभागी होणार
सांगली: पुरग्रस्तांना मदतीची जशी गरज आहे तशीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच गरजेचे असल्याने आजपासून राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या ६० डॉक्टरांच्या ६ टीम पुरग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्हयांना पुराचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी या पुरग्रस्तांना सुरुवातीपासून मदत करत आहेतच शिवाय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्त भागाला भेट देत पुरग्रस्तांशी संवाद साधला. त्याचवेळी शरद पवार यांनी सरकारला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र सरकारची ती मदतही तुटपुंजी असल्याचे पुरग्रस्तांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहेच परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या १० – १० च्या ६० डॉक्टरांच्या टीम, रुग्णवाहिका आणि पुरेसा औषधसाठा घेवून रवाना झाल्या आहेत. याशिवाय या टीममध्ये त्या त्या भागातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉक्टर सेलच्या ६० डॉक्टरांच्या ६ टीम सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात रवाना झाल्या आहेत अशी माहिती डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी दिली.