Published On : Tue, Mar 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सिमेंट-स्टीलवर पर्याय शोधणे गरजेचे : ना. गडकरी

Advertisement

बांधकाम खर्चात बचत करणे शक्य

नागपूर: देशामध्ये पायाभूत सुविधा उभारताना अनेक आव्हाने उभी आहेत. पायाभूत सुविधांचे जाळे वाढवीत असताना बांधकामांवर होणारा खर्च हा कमी कसा होईल, याचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे. यासाठी सिमेंट व स्टीलवर पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय इमारत बांधकाम असो की रस्ते बांधकामावरचा खर्च कमी होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे भारतातील रस्त्यांचा विकास या विषयावर संस्थेच्या 17 व्या वार्षिक परिषदेत ना. गडकरी नवी दिल्ली येथे बोलत होते. याच कार्यक्रमात पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले- बांधकामाचा खर्च कमी करताना बांधकामाच्या दर्जात कोणताही समझोत होऊ नये. दर्जा उत्तम राखून खर्च कमी करणे शक्य आहे. रस्ते बांधकाम करताना त्यात वेस्ट रबर, प्लास्टिकचा वापर करून बांधकाम यशस्वी झाले आहे. हे करताना बांधकामाच्या दर्जाशी कोणताही समझोता करण्यात आला नाही. डांबरी रस्ते बांधतानाही हेच तंत्र वापरून रस्ते बांधकाम शक्य झाले आहे. 10 टक्के प्लास्टिक किंवा रबर वापरून चांगले रस्ते निर्माण झाले आहेत, असेही ते म्हणाले.

नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचर्‍याचे संपत्तीत रुपांतर करणे शक्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. यावर जलसंधारणाची कामे करणे हा उत्तम उपाय आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची कामे करताना जलसंधारण होईल याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठराला. महाराष्ट्रात ज्या भागात अशी कामे झाली आहेत. त्या भागातील जलस्तरात मोठी वाढ झाली आहे. पॉवरग्रीड प्रमाणे वॉटरग्रीडही निर्माण करण्याचीही आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

जल, वायू आणि ध्वनि प्रदूषण ही देशासमोरील मोठी समस्या असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- डिझेलचा अधिक वापर आपल्याकडे होत आहे. डिझेलमुळे प्रदूषण अधिक होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होतो. डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून व इलेक्ट्रोलायझरचा वापर करून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती शक्य आहे. यामुळे प्रदूषण होणार नाही आणि सांडपाण्यातील कचर्‍यावर उपाययोजना होईल. कचर्‍यातून मिळालेले प्लास्टिक आणि रबरचा वापर डांबरीकरणात शक्य आहे.

आता आम्ही फ्लेक्स इंजिन आणले आहे. 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के इथेनॉलचा वापर या इंजिनमध्ये शक्य आहे. बांधकाम क्षेत्रात लागणार्‍या मशीनरीजही फ्लेक्स इंजिन लावले तर बांधकामाचा खर्चही कमी होईल. सीएनजी, बायो सीएनजी, इथेनॉल, इलेकिट्रक अशा इंधनाचा वापर करण्याची वेळ आता आली आहे. दर्जाशी कोणताही समझोता न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हा बदल करू शकतो, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

Advertisement
Advertisement