Published On : Fri, Mar 23rd, 2018

लोकशाहीचा खून यापूर्वी कधी झाला नाही – जयंत पाटील

Advertisement


मुंबई: विरोधी पक्षाने विधानसभेच्या अध्यक्षांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर आणि कामकाजावर चर्चा झाली असती तर सरकारची लक्तरे निघाली असती म्हणूनच पोरकटपणाने अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मंजुर करण्यात आला. लोकशाहीचा खून यापूर्वी कधी झाला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमच्या गावात सोसायटया असतात त्यामध्ये घडलेला किस्सा सांगताना अविश्वास ठराव येणार म्हणून चेअरमन कागदपत्रांची फाईल ठराव मंजुर करुन घेवून निघून गेला. तसा आजचा किस्सा यापेक्षा काही वेगळा घडला नाही. इतका पोरकटपणा माझ्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत पाहिला नाही. अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव मांडल्यावर सत्ताधाऱ्यांनी सभागृह तहकुब करायची गरज नव्हती. अध्यक्षांचे कौतुकही करायचं नाही आणि विश्वासदर्शक ठराव मांडून गेले निघून ही पध्दत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलून न देणे किंवा आम्ही मांडणारे मुद्दे सत्ताधारी सदस्याला मांडायला देणे आणि सतत विरोधी पक्षाच्या सदस्यांवर दबावाखाली अन्याय करणे हा प्रकार वाढल्यामुळे आम्ही अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडला होता. या ठरावावर चर्चा कधी करणार असे आम्ही सातत्याने विचारत होतो. परंतु आज अचानक विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मूळात अविश्वास दर्शक ठराव अध्यक्षांनी वाचायचा असतो आणि त्यावर २९ सदस्य उभे राहून दिवस ठरला जातो आणि मग चर्चा घडवली जाते. परंतु असे काहीही करण्यात आले नाही. अविश्वास ठराव मांडा असे सांगितल्यामुळे सरकार घाबरले आणि त्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजुर करुन घेतला.

विधानसभेचे कामकाज कोणत्या पातळीवर गेले आहे हे लक्षात येत आहे. तुम्हाला तुमचा विश्वासदर्शक ठराव लखलाभ होवो परंतु आमच्या अविश्वास ठरावावर चर्चा व्हावी अशी आमची मागणी आहे. अविश्वास ठरावावर चर्चा होवू दयायची नाही ही हुकुमशाही पध्दत असून ही पध्दत भाजप वापरत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान आम्ही अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर ठाम असून राज्यपालांकडे विरोधी पक्ष जावून आमचे म्हणणे मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Advertisement