बुलढाणा: जिल्ह्यातील काही भागांत सुरू असलेल्या केस गळतीच्या घटनांनंतर आता एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. अनेक रुग्णांच्या नखांमध्ये कमजोरी आणि गळती दिसून येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यांमध्ये डिसेंबरपासून नागरिक केस गळतीमुळे त्रस्त होते. आता त्याच रुग्णांमध्ये नखं विद्रूप होऊन गळून पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. काहींना नखांमध्ये पिवळसरपणा, तडे जाणं, आणि पूर्णपणे नखं निघून जाणं अशी लक्षणं दिसून आली आहेत.
नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप-
आरोग्य विभागाने तपासणी केल्याचं जरी सांगितलं तरी प्रत्यक्षात कोणताही ठोस उपचार रुग्णांना मिळालेला नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. ICMR च्या पथकाने रक्तनमुने घेतले असले तरी अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे सरकार काहीतरी दडपून ठेवत आहे का, असा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
सेलेनियम या घटकाचे प्रमाण वाढल्याने समस्या वाढल्याची भीती –
जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी सांगितलं की, सध्या चार गावांमध्ये एकूण 29 रुग्णांमध्ये नखांची समस्या आढळून आली आहे. प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील तपासणीसाठी रुग्णांना शेगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सेलेनियम या घटकाचं प्रमाण वाढल्याने ही समस्या उद्भवत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, रुग्णांना पूर्ण उपचार व आर्थिक मदत द्यावी, आणि या रोगाचं मूळ शोधून काढावं, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.