पाटणमध्ये कृषीपंपांच्या पहिल्या वीजजोडणीचा ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांचे ऋृण फेडण्यासाठी पैसे भरूनही कृषीपंपांच्या प्रलंबित असलेल्या 2 लाख 28 हजार वीजजोडण्या देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु केली आहे. या योजनेतील तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील विद्युतीकरण व विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी ११ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा बावनकुळे यांनी या कार्यक्रमात केली. महावितरणच्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मरळी येथे कृष्णाजी पाटील यांच्या कृषीपंपाला देण्यात आलेल्या पहिल्या वीजजोडणीचा शुभारंभ ऊर्जामंत्री यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आमदार शंभुराज देसाई, महावितरणचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, वीराज देसाई, ॲड. मिलिंद पाटील, महावितरणच्या अधीक्षक अभियंता पुनम रोकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटण तालुक्यातील ७ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन बावनकुळे यांच्याहस्ते झाले व त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की राज्यात २००५ ते २०१५ या कालावधीत तब्बल 5 लाख 18 हजार कृषीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित होत्या. या जोडण्यांना तातडीने वीजजोडण्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला व त्याप्रमाणे संपूर्ण वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता २०१५ ते २०१८ दरम्यान २ लाख २८ हजार कृषीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित आहेत. या जोडण्या देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला परंतु त्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधण्याचे काम सुरु झाले. यामध्ये एक ते दोन शेतकऱ्यांना एकच रोहित्र असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु करण्यात आली. या योजनेत कृषीपंपाच्या एका वीजजोडणीसाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च येत असला तरी पुढील २० वर्ष रोहित्र जळण्याचा किंवा त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च नाही तसेच शेतकऱ्यांना सुरळीत व योग्य दाबाने वीज मिळणार आहे. ही योजना खर्चिक असली तरी शेतकऱ्यांचे ऋृण फेडण्यासाठी सुरु केल्याचे त्यांनी सांगतिले. या सरकारच्या कार्यकाळात तब्बल ७ लाख५० हजार शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा तसेच स्वस्त व शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु केल्याची माहिती ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली. सध्या ७५०० शेतकऱ्यांना सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून येत्या वर्षभरात सौरकृषी वाहिनी प्रकल्पांद्वारे ३५३५ मेगावाॅट वीजनिर्मिती करून राज्यातील ७ लाख५० हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या वीजपुरवठ्याचा खर्च प्रतियुनिट ६ रुपये येत आहे. मात्र सौर ऊर्जेची वीज तीन रुपयांनी स्वस्त राहणार आहे. यासोबतच ज्या भागात वीजयंत्रणा उभारणे अशक्य आहे अशा डोंगर दऱ्यात, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात अटल सौर कृषीपंप योजनेतून १ लाख सौर कृषीपंप केवळ १५ ते २० हजार रुपयांत अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील १५०० नळपाणीपुरवठा योजना या सौरऊर्जेवर आणल्या असून आणखी २००० योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील कृषीपंपांना सहा रुपये प्रतियुनिट दराची वीज १ रुपये ८० पैसे दरापर्यंत उपलब्ध करून देत असतानाही वीजबिलांची थकबाकी ३२ हजार कोटींवर गेली आहे. ज्यांना शक्य आहे त्या सधन व आर्थिक संपन्न असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.