मुंबई: नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते, वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्य वेळी उपचार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने उपचारांची व्यवस्था केली. यामुळे या तरुण अभियंत्याचे प्राण वाचले!
वेळेवर उपचार आणि यशस्वी प्रत्यारोपण!
आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही वेळेत उपचार मिळत नसल्याने मुलाचे होणारे हाल कुटुंबासाठी असह्य झाले होते. शेवटी तीर्थनकारच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. या हाकेला त्वरित प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना कार्यवाहीचे आदेश दिले. श्री. नाईक यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. जिथे उपचारांसाठी एक वर्ष लागले असते, तिथे अवघ्या दोन महिन्यांत ‘ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ यशस्वी झाले. तीर्थनकारने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत येत कर्करोगावर विजय मिळवला!
आज तो अनेकांच्या जगण्याची प्रेरणा!
आज, २८ मार्च रोजी तीर्थनकार प्रत्यारोपणानंतरची पहिली लस घेण्यासाठी नागपूरहून मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये आला. उपचारानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने बालपणातील सर्व लसी पुन्हा घ्याव्या लागतात. ही प्रक्रिया त्याच्यासाठी संघर्षाच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. आज तीर्थनकार केवळ स्वतःचे नवजीवन जगत नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती करतो. निरोगी राहण्याचे सल्ले देतो आणि कर्करोगाशी लढणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनतो.
मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण!
तीर्थनकारचा आजाराशी लढा आणि त्यावर मिळवलेला विजय वैयक्तिक नाही, तर संवेदनशील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि तत्पर कक्ष प्रमुख यांनी माणुसकीच्या भावनेतून दिलेल्या मदतीचे जिवंत उदाहरण आहे. एका वडिलांची हाक आणि मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता यामुळे आज तीर्थनकार नव्या उमेदीने आयुष्य जगतोय!
कक्ष प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी उत्सुक
मी श्री रामेश्वर नाईक यांचे मनापासून आभार मानतो. उपचारांसाठी सामान्यतः एक वर्ष लागणारी प्रक्रिया त्यांच्या प्रयत्नांमुळे लवकर पार पडली, ज्यामुळे मी चौथ्या टप्प्यात निदान झालेल्या कर्करोगावर विजय मिळवू शकलो. आज, प्रत्यारोपणानंतर एका वर्षाने, मी लस घेतली आणि नवीन जीवन जगतोय. हे सर्व श्री. नाईक यांच्यामुळे शक्य झाले. मी त्यांचे फोनवरून आभार मानले आहेत, पण लवकरच त्यांची भेट घेऊन आभार मानण्यास मी उत्सुक आहे.
— तीर्थनकार रॉय, माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) अभियंता