Published On : Fri, Aug 20th, 2021
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महा मेट्रोच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गाचे नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे नागपूरमध्ये लोकार्पण संपन्न

नागपूर : महामेट्रोने नागपूरात स्थापन केलेले सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिका तसेच फ्रीडम पार्क हे नागपूरच्या वैभवात भर टाकतील.नागपूरमध्ये जागतिक दर्जाची बरीच कामे होत आहेत. पहिल्यांदाच आपल्या देशात टू टायर मेट्रोची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे उदघाटन आज स्थानिक झिरो माईल येथे झाले . त्यावेळी गडकरी बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून केंद्रीय मंत्र्यासोबत या मार्गिकेवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेलला झेंडा दाखवून रवाना केले . याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नगर विकास सचिव डी.एस. मिश्रा , नागपूरचे पालकमंत्री आणि उर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित उपस्थित होते.

झिरो माईल स्टेशन येथे कॉटन मार्केट या स्थानावरून ट्रफिक सिग्नलच्या अडथळ्याशिवाय पोहचण्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मधून एक भूयारी मार्ग मंजूर करू असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी दिले .नागपूर शहरातील तेलंखेडी तलाव तसेच उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरण यामध्ये महा मेट्रोची खूप मदत झाली असेही त्यांनी सांगितलं. मेट्रोच्या फेज दोनचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन चालू केला आहे . राज्याला आवश्‍यक तो सर्व निधी केंद्र सरकार तर्फे दिला जाईल मुंबई ठाण्याच्या विकासाकरिता अतिरिक्त १ लाख कोटी रुपयांचा निधी सुद्धा मुंबईच्या प्रस्तावित बैठकीमध्ये देण्याचं आश्वासन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेना यावेळी दिले.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला 21 ऑगस्ट 2014 रोजी मंजुरी देण्यात आली आणि त्याची पायाभरणी त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागपूरची माझी मेट्रो एक ग्रीन मेट्रो आहे, ज्यामध्ये एकूण ऊर्जेच्या 65% सौर ऊर्जचा वापर , पाण्याचा 100% पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते . सर्व स्थानकांवर बायो डायजेस्टर्सही आहेत. मेट्रोला 60% हुन अधिक महसूल नॉन-फेअर-बॉक्समधून प्राप्त होतो. नागपूर मेट्रो हरित ऊर्जा वापरत असल्याने हा प्रकल्प एक स्वच्छ तसेच शाश्वत प्रारुप म्हणून सक्षम असल्याचे केंद्रीय नगर विकास तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर मेट्रोचा हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . कस्तुरचंद पार्कची स्थापत्य कला पारंपरिक राजपूत पद्धतीने साकारली असून कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकाचा दर्शनी भाग आणि त्याची स्थापत्य कला याच धर्तीवर साकारली आहे. राजपूत स्थापत्य कलेचे सांकेतिक भाग जसे छत्री, तोरण, राजपूत जाळी, कॉलमवरील नक्काशी मेट्रो स्थानकात दर्शवल्या गेली आहे. यामुळे शहरात एक अनोखी वास्तू निर्माण होण्यास मदत मिळाली आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अ‍डथळा येऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली . मेट्रो प्रकल्पाचे उन्नत -एलिव्हेटेड मार्ग तयार करताना या मार्गाच्या खाली सुद्धा सौंदर्यीकरण तसेच नागरिकांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष द्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विकास झाला पाहिजे पण त्यात कुठलीही उणीव किंवा कमतरता राहिली नाही पाहिजे याची खात्री आपण घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी सुद्धा पुढच्या 75 व्या वर्षापर्यंत टिकेल असे चांगलं काम आपण जनतेसाठी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

मुंबई ते पुणे हे अंतर केवळ दोन तासात कापता येईल असा एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बांधला गेला. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या समृद्धीला व विकासाला कारणीभूत ठरेल , असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . मुंबई आणि पुणे येथे देखील मेट्रोची ट्रायल रन सुरू झाली असल्याच शिंदे यांनी सांगितलं.

नागपूर मेट्रोने संविधान चौका पासून ते या झिरो माइल पर्यंत केलेलं हे मेट्रोच काम हेरिटेज वॉक म्हणून उदयास येईल . सदरची मेट्रो सेवा ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा मिळण्यासाठी लाभदायक ठरेल असे नागपूरचे पालकमंत्री आणि उर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी यावेळी सांगितलं .

नागपूर मेट्रोने हा प्रकल्प दळणवळणाची कुठलीही सुविधा बंद न करता वेळेच्या आत पुर्ण केले असल्याचं राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं .

नागपूरचा झिरो माइल हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे स्थळ असून 1907 साली ब्रिटिशांनी द ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वेचा प्रारंभ झिरो माइल या नागपुरातल्या स्थळातून केला होता अशी माहिती महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मेट्रोचे हे झिरो माईल स्थानक २० माळ्याचे राहणार असून या स्थानाच महत्त्व अधोरेखित होणार असल्याचंही त्यांनी सांगितल .

1.6 किलोमीटर लांब या सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क मार्गिकेवरील मेट्रो प्रवास आज पासून सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडेल जातील. हा मार्ग नागपूर शहरातील विधान भवन , भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज.अशा अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो . नागपुरात स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन हे देशातील अश्या प्रकारचे पहिले मेट्रो स्थानक असेल जे एका भव्य २० मजली इमारतीचा भाग असेल आणि ज्याच्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन अवागमन करेल.


देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले याचेही उद्घाटन आज पार पडले. या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवल्या आहेत. युद्धात वापरलेला टी -55 रणगाडा देखील येथे नागपूरकरांना बघता यावे म्हणून स्थापित केला आहे. फ्रिडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अँफी थियेटर आहे. येथील हिस्ट्री वॉल शाहिद स्मारक पर्यंत आहे.मेट्रो रेल्वे नागपूरच्या या मार्गाच्या उद्घाटनासह, भारताने 18 शहरांमध्ये 725 किलोमीटरचे मेट्रो रेल्वे कव्हरेज साध्य केले आहे, ज्यामध्ये दिल्ली मेट्रोचा मोठा वाटा आहे.

याप्रसंगी सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गिकेवर प्रवास करुन या मार्गिकेवर प्रवाशी सेवेचा शुभारंभ केला. या उद्‌घाटन सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनीधी , महामेट्रोचे, महाराष्ट्र तसेच नागपूर जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement