बंगळुरु: बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी दोन फरार आरोपींना कोलकाता जवळून अटक केली.अदबुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
आपली ओळख लपवून ते कोलकाताजवळ वास्तव्य करत होते असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.एनआयएने दोन वॉण्टेड आरोपींवर प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
मागील महिन्यात एनआयएने ताहा आणि शाजीब यांचे फोटो आणि तपशील जारी केले होते. या दोघांवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. शाजीब याने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता.तर ताहा हा स्फोटाची योजना आणि अंमलबजावणी, त्यानंतर कायद्याच्या तावडीतून पळून जाण्याचा मास्टरमाईंड आहे,अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
1 मार्च रोजी एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेमध्ये आला होता. त्याने आपल्या जवळील एक बॅग कॅफेतच ठेवली. त्यानंतर तो कॅफेतून बाहेर पडला. त्यानंतर जवळपास एक तासाने कॅफेमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये 10 जण जखमी झाले होते.