नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या कार्यालयात निनावी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक नागपुरात दाखल झाले. कर्नाटकातील बेळगावी येथील तुरुंगातून अटक केलेल्या जयेश पुजारी उर्फ कांथा नावाच्या खुनाच्या गुन्हेगाराने हे कॉल केले होते.
एनआयएने कर्नाटकातील बंगळुरू येथे गुन्हा दाखल केला आहे, तर मुंबईच्या टीमला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, एनआयए मुंबईचे एक पथक नागपुरात आले आणि त्यांनी या प्रकरणातील कागदपत्रे आणि महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. एनआयएचा तपास दहशतवादी नेटवर्कचा संपूर्ण पर्दाफाश करण्यासाठी आणि दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डची भूमिका तपासणे हा तपासाचा केंद्रबिंदू असेल. 14 जानेवारी रोजी पुजारीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. 21 मार्च रोजी त्याने आणखी एक फोन केला आणि गडकरींना 10 कोटी रुपये न दिल्यास नुकसान करू, अशी धमकी दिली. पुजारीला 28 मार्च रोजी बेळगावी तुरुंगातून नागपुरात आणण्यात आले आणि त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा लागू करण्यात आला.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, एनआयए अधिकार्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला कारण पुजारीचे लष्कर-एतैयबाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख कॅप्टन नसीर यांच्यासह दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आढळून आले. पुजारीने देशाच्या ईशान्येकडील भागात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही घेतले होते. पुजारीच्या चौकशीदरम्यान त्याने नसीरची तुरुंगात भेट घेऊन बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. तो तुरुंगातील अन्य दहशतवाद्यांच्या संपर्कात आला, त्यात फहाद कोया, अफसर पाशा, तसेच ‘डी’ गँगचे सदस्य रशीद मलबारी आणि गणेश शेट्टी यांचा समावेश आहे.
हे आरोपी तुरुंगात पुजारीला आर्थिक मदत करत होते. कर्नाटकचे माजी डीसीएम ईश्वर अप्पा यांच्या हत्येसाठी पुजारीने शकीलला सुपारी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शकीलला पहिल्यांदा 2018 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर 2019 मध्ये तो याच गुन्ह्यात पकडला गेला होता. 2021 मध्ये त्याला अपहरण आणि बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो तुरुंगात पुजारीला भेटला आणि पुजारीने त्याला जामीन मिळण्यास मदत केल्याची माहिती आहे.