नागपूर: राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळाले. मात्र निवडणूक प्रचाराच्या महत्त्वाच्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देवेंद्र फडणवीसांना दिलेली साथ मोलाची ठरल्याचे पाहायला मिळाले.
नितीन गडकरींनी फडणवीसांना दिलेली साथ ठरली मोलाची –
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस हे हताश झाले होते. या अपयशाची जबाबदारी घेत फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने प्रयत्न केले. सर्व जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत फडणवीसांनी धोरणात्मक नियोजन केले. याचदरम्यान गडकरी फडणवीसांसह महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले.
नितीन गडकरींनी सर्वाधिक 72 सभांचा लावला धडाका –
भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाजपच्या सर्वच नेत्यांना पाठीमागे टाकत यंदा सभा व रॅलींचा विक्रम केला. गडकरी यांनी 72 सभा व रोड शोमधून मतदारांना भाजपप्रणित महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.सभा आणि रॅली घेण्यात त्यांनी भाजप नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनाही मागे टाकले. गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 13 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या चार सभांसह त्यांच्या एकूण जाहीरसभा तसेच रोड शोजची संख्या 72 गेली ती इतर नेत्यांपेक्षा रेकॉर्डब्रेक ठरली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघही महायुतीच्या विजयाचे शिल्पकारांपैकी एक-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला ऐतिहासिक विजय मिळाला.
या विजयाचे शिल्पकारांपैकी एक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस अतुल लिमये. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन रणनीती आखली. त्याचबरोबर त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजप-महायुतीला एकहात्ती सत्ता मिळण्यात मोठी भूमिका बजावली.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रति राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीच्या चर्चा होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने संघाची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. संघाच्या सदस्यांनी नागपुरात घरोघरी जाऊन महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहनही केले .
फडणवीसांनी निकाल जाहीर होण्याआधी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट –
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर होण्याच्या एकदिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात संघाच्या मुख्यालयात भेट घेतली. मोहन भागवत हे शहरात असल्याने मी त्यांना भेटायला गेलो होतो. हा एक शिष्टाचार होता, असे फडणवीस म्हणाले होते.