नागपूर/नवी दिल्ली : फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे उत्पादित होणाऱ्या कृषी उत्पादनांमध्ये उत्पादन खर्च कमी होईल अशा रीतीने उत्पादनांचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये विपणन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. एम.एस.एम.ई. क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावरील वेबीनारला ते संबोधित करत होते. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार विकास महात्मे, एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पार्लेवार उपस्थित होते.
फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी आपल्या उत्पादनवृद्धी करताना उत्पादनखर्च तसेच वाहतूक, श्रम खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्यासोबतच उत्पादनांच्या गुणवत्ते सोबत तडतोड न करता उत्पादने ही देशांतर्गत बाजारांमध्ये अगोदर स्थापित पाहिजे. त्यानंतर अतिरिक्त उत्पादन देशाबाहेर निर्यात केले पाहिजे, असे गडकरी यांनी या वेबिनारला उपस्थित अमरावती जिल्ह्यातील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सांगितले.
शेतकऱ्यांनी उत्पादन घेताना खर्च कमी करणे आणि उद्योगांनी आपल्या प्रक्रियामध्ये खर्च कपात करणे या गोष्टी नफा देणा-या ठरू शकतात. डाळ मिल क्लस्टर असणा-या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये सोलर रूप टॉप, मालाची रेल्वे द्वारे वाहतूक, ड्रायपोर्टचा वापर याद्वारे आपला उत्पादन , वाहतून खर्च कमी करू शकतात असे गडकरी यांनी यावेळी सुचवलं . शेतक-यांनी रासयनिक खते आणि किटकनाशकांचा वापराऐवजी कृषीच्या टाकाऊ सामग्रीपासून सेंद्रीय खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक संसाधने उपलब्ध असून त्या उत्पादनांचे जिल्हानिहाय एक विजन खादी ग्रामोद्योग विभागातर्फे फार्मर प्रोड्युसर कंपनीला देता येईल.
चंद्रपुरमध्ये फ्लाय प्रॉडक्टचे उत्पादने , गडचिरोली, चंद्रपूरमध्ये बांबू पासून अगरबत्तीचे क्लस्टर, भंडारा येथे रेशीम आणि मध अशा विविध उत्पादनांमध्ये क्लस्टर स्थापन करून फार्मर प्रोड्युसर कंपन्या उत्पादन करु शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी मंत्रालयाच्या ‘इक्वीपमेंट बँक’ या योजनेसंदर्भाही गडकरी यांनी माहिती दिली. या योजनेअंतर्गत शेतकरी समूह किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी एकत्र येऊन शेतीकामाच्या यंत्राची खरेदी करून ती भाडेतत्वाने काम करण्यासाठी वापरू शकतात.
अमरावती जिल्ह्यातील तब्बल 55 फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत 20 हजार शेतकरी जोडले गेले असून यांच्या उत्पादनाच्या विपनणासाठी टाटा इंटरनॅशनल ,वॉलमार्ट सारख्या कंपन्या सोबत करार झालेले आहेत. या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या उत्पादनाचे कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार झाले असल्याची माहिती , एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पार्लेवार यांनी यावेळी दिली.
फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधींनी या वेबीनारच्या शेवटी विचारलेल्या संत्रा प्रक्रिया उद्योग तसेच इतर प्रश्नांना नितीन गडकरी यांनी उत्तरे दिली.
टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या मार्गदर्शना करिता आणि कृषी आणि एमएसएमई विभागाच्या त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे नागपूरमध्ये आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या वेबिनारला विदर्भातील फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रतिनिधीं, टाटा इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित होते.