दिव्यांगाचा प्रवास होणार निर्विघ्न
नागपूर: पुण्यात जाऊन स्वत:चे कर्तृत्व सिध्द करायचे तर होते पण तेथे पोहोचण्याची अडचण सतत अडथळा बनत होती. पुण्यात जाण्यासाठी किमान रेल्वेत बसण्यापुरती जागा तरी मिळाली पाहिजे अशी साधी अपेक्षा होती दिव्यांगांची. आरक्षणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले, शेवटी दिव्यांग पोहोचले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आणि सांगितली अडचण. गडकरी या दिव्यांगांच्या डोळ्यातील भाव पाहून प्रभावित झाले आणि रेल्वेमंत्र्यांना एक पत्र लिहून दिव्यांगांना आरक्षण उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
या पत्रामुळे अवघ्या चार दिवसात सर्वांच्या कानावर बातमी आली अन् आश्चर्याचा धक्का बसला. केवळ आरक्षण मागितले होते. पण हाती आले ते भारतीय रेल्वेच्या पूर्ण दोन डब्यांचे बुकिंग. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी ही बातमी एक सुखद अनुभव देणारी ठरली. आजपर्यंत मंत्री केवळ आश्वासने देतात अशीच समज होती. पण गडकरींनी दिव्यांगांना करून दिलेली व्यवस्था ही आश्वासने फोल नसतात हे सिध्द करणारी ठरली आहे. गडकरी हे अन्य मंत्र्यांपेक्षा वेगळे आहेत अशा भावना खेळाडूंच्या तोंडून बाहेर येत होत्या.
पुण्याच्या बालेवाडी मैदानावर 13 ते 15 मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध शाळातील 148 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. पुण्याचा प्रवास हा 15 तासांपेक्षा अधिक असल्याने या खेळाडूंना रेल्वेगाडीत आरक्षण देण्यात यावे, या संदर्भात समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेेलगोटे व राज्य दिव्यांग शाळेचे अध्यक्ष रमेश भंडारी यांनी गडकरींना भेटून निवेदन दिले,
नितीन गडकरी यांनी परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले व सवलतीच्या दरात बुकिंग व्हावे अशी विनंतीही केली. गडकरींचे पत्र मिळताच रेल्वे मंत्र्यांनी देखील याची तातडीने दखल घेतली व मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला निर्देश दिले. 12 व 15 मार्च रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे लावण्याचे आदेश जारी केले.