मनपाच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नागपूर : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलेच महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात परंतु ही सर्वच मुले शिक्षणात मागे पडतात हा सर्वसामान्यांचा समज नागपूर महानगरपालिकेने खोडून काढला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता आहे, त्यांना फक्त प्रोत्साहन आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ही गरज ओळखून नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी जे विशेष कोचिंग पॅटर्न राबविले त्याचे फलित या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दर्शविले आहे.
दहावीची ही परीक्षा जीवनातील शेवटची परीक्षा नाही, ही सुरुवात आहे. जीवन हीच एक मोठी परीक्षा आहे. करियरच्या वाटेत अनेक परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर आपली क्षमता सिद्ध करा. आपल्या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम आहे, असा मंत्र केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांनी घवघवीत यश प्राप्त केले. मनपाच्या २९ शाळांमधील १३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत येऊन शहराचे लौकिक वाढविले. या १३ गुणवंतांचा शनिवारी (ता.८) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुणगौरव केला
ना. गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी झालेल्या गुणगौरव समारंभात उपमहापौर मनिषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे उपस्थित होते.
यावेळी दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी जयंता अलोणे, दत्तात्रयनगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा समीर जांभुळकर, शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी भारती नगरारे, दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी संतोष गिरी, जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी अंशारा मुनिबा, सरस्वती तिवारी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तृप्ती दुबे, एम.ए.के.आझाद माध्यमिक शाळेची निशा नाज सादीक, आलीया बानो सादीक, फिरदोस परवीन नूर, दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी साक्षी भोरे, गरीब नवाज मनपा उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सादिका खातून मो. अली, जयताळा मनपा मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी दिप्ती हर्षे आणि दुर्गानगर मनपा मराठी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी संगीता हुमणे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशस्तीपत्र, कॉलेज बॅग आणि भेटवस्तू प्रदान करून गुणगौरव केला.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या गरीब घरच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणीत आणण्याचे काम शिक्षण समिती आणि विभागाने केले आहे. यासाठी परीश्रम घेतलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्या पालकांचेही अभिनंदन.
आजपर्यंत शहरातील मोठ्या खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांचेच नाव प्रावीण्य श्रेणीत दिसायचे. मात्र मनपाच्या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. गुणवंत १३ विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली आहेत. संधी मिळाली तर आम्हीही घवघवीत यश प्राप्त करू शकतो, हे या मुलींनी दाखवून दिले आहे.
आमदार असताना स्वतःचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची संधी मिळाली होती. मात्र ते स्वतः सुरू न करता शहरातील अंजुमन संस्थेला दिले, अशी आठवण सांगताना आज या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक मुलींनी समाजात आदर्श निर्माण केला आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
९ विद्यार्थिनींमध्ये ४ मुली मुस्लिम समाजातील असून त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष अभिनंदन केले. आज मुस्लिम समाजाला शिक्षणाची गरज आहे. समाजातील मुलामुलींनी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्वयन शिक्षण विभागाचे विनय बगले आणि संचालन प्रभारी सहा.शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले. प्रा. दिलीप दिवे, प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार
मनपा शाळांचा निकाल वाढवून विद्यार्थ्यांमधील क्षमता वृद्धींगत करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समिती आणि शिक्षण विभागातील सर्वांनीच मोलाचे कार्य केले आहे. या सर्वांच्या परीश्रमानेच मनपाने हे साध्य केले, अशा शब्दांत ना.नितीन गडकरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या सर्वांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
गुणवंत विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग देणाऱ्या शहरातील विविध तज्ज्ञ शिक्षकांनाही त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावे, असेही त्यांनी सूचित केले.
शहरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नरत : प्रा.दिलीप दिवे प्रारंभी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण समितीद्वारे करण्यात आलेल्याकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, मागील तीन वर्षापासून मनपात शिक्षण समिती सभापती पदाची धूरा सांभाळता मनपाच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातीला मनपाच्या २२ शाळांमधील शिक्षकांना शिक्षणतज्ज्ञांद्वारे ‘वनामती’ येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर दहावीचा निकाल वाढविण्यासाठी सत्राच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले.
१०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिक्षणतज्ज्ञाद्वारे विशेष कोचिंग देण्यात आले. त्याचे यश आज आपल्यापुढे आहे. शहरातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षण घेता यावे, यासाठी शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा मानस आहे.
यासंबंधी निविदा प्रक्रियाही पार पडली. मात्र कोव्हिड मुळे ते कार्य थांबले आहे. शहरात या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणीही प्रा. दिलीप दिवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.