नागपूर : भाजपकडून सातत्याने मराठी माणसाला आपल्या पायाखाली आणायचे षडयंत्र रचण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षाकडून मराठी माणसाचा आवाज दाबण्यात येतो. त्यातील एक नेते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. आगामी लोकसभेला गडकरींचा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
देशाच्या विकासात नितीन गडकरींचा मोठा वाटा आहे.गडकरी सांभाळत असलेल्या खात्यात त्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे. मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठीना त्यांचे काहीच कौतुक नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत गडकरी दिल्लीत असू नयेत म्हणून त्यांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे असे राऊत म्हणाले.
गडकरी परखड, स्पष्टवक्ते आहेत. शिवाजी महाराजांचे भक्त असल्याने ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही त्यांना ओळखतो, त्यांचे आमचे मतभेद पण आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम केले. विकासाला महत्त्व देतात. ढोंगबाजी आणि फसवेगिरीला देत नाहीत. चार दिवसांपूर्वीच गडकरी बोलले होते. या देशातील शेतकरी, मजूर, कष्टकारी दु:खी आहे, समाधानी नाही. एखाद्या मंत्र्यांमध्ये असं बोलण्याची हिंमत आहे का? गडकरी व्यासपीठावर स्वाभिमानाने उभे असतात. राजनाथ सिंह यांच्यासारखे गळ्यात हार घालायची धडपड करायची आणि अमित शाहांनी डोळे वटारल्यावर मागे जायचे हे उद्योग गडकरींनी केल्याचे आम्ही पाहिले नाही, असेही राऊत म्हणाले.