नागपूर : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही , असा दावा केला होता. तसेस शहरात चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात गडकरींचा दावा फोल ठरला आहे. शहरात पाणी समस्येच्या मुद्यावरून नागरिकांनी महापालिकेच्या आशीनगर झोनवर मोर्चा काढला.
नागपूर महापालिकेने शहरातील पाणी वितरणाचे खासगीकरण करीत ‘ओसीडब्ल्यू’ कंपनीकडे योजनेच्या संचालनाची जबाबदारी दिली. भाजपच्या नेत्यांकडून या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गडकरी हे जाहीर कार्यक्रमात या योजनेचा उल्लेख करीत योजना लागू केल्यापासून नागपूरमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघणे बंद झाले, असा दावा केला. मात्र गडकरी यांना त्यांच्याच पक्षाने घरचा आहेर दिला आहे.
बुधवारी उत्तर नागपूरमधील पाणीटंचाईच्या संदर्भात भाजपाचे उत्तर नागपूरचे उपाध्यक्ष दिनेश इलमे यांच्या नेतृत्वात आशीनगर झोन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लष्करीबागमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी उत्तर नागपूर भाजपाचे संपर्क मंत्री संजय तरारे, उपाध्यक्ष महेश माने, मनोज कहाळकर यांच्यासह अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.