नागपूर: निवडणुकीत पोस्टर्स आणि बॅनरबाजी न करता ‘सेवेच्या राजकारणावर’ मतं जिंकली जातात, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले. ज्यांना मत द्यायचे आहे ते मतदान करतील आणि ज्यांना नाही ते करणार नाहीत,म्हणून पुढच्या निवडणुकीत मी आता आपल्या मतदारसंघात कोणतेही पोस्टर लावणार नाही किंवा लोकांना चहा देणार नाही, असा निर्णय गडकरी यांनी जाहीर केला.
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खचरियावास गावात माजी उपाध्यक्ष भैरोसिंग शेखावत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.मी अत्यंत चुरशीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. सर्वांनी मला तिथून न लढण्यास सांगितले होते, पण मी लढलो. आता मी ठरवले आहे की पुढच्या निवडणुकीत पोस्टर, बॅनर लावणार नाही, चहा देणार नाही की आणखी काही करणार नाही. ज्यांना मतदान करायचे आहे ते मतदान करतील आणि ज्यांना नाही ते मतदान करणार नाही, असे ते म्हणाले.
सेवेचे राजकारण’, ‘विकासाचे राजकारण’, खेड्यातील गरिबांचे कल्याण, गरीबांना आरोग्य सुविधा, तरुणांना रोजगार आणि मुलांना चांगले शिक्षण देऊन मते मिळवली जातात,’ असेही ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की “सेवेचे राजकारण” ही संकल्पना आरएसएसचे विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आणली होती आणि या संकल्पनेवर त्यांनी वरील विधान केले.