पूर्व नागपूरच्या विविध प्रकल्पाबाबत मनपा आयुक्त यांचेसोबत घेतली आढावा बैठक
नागपूर : निवडणूक संपताच विकासकामाच्या बाबतीत नेहमीच आक्रमक पवित्रा घेणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचेसोबत अमृत योजना, स्मार्ट सिटी, पारडी ब्रिज, साई-आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल व अन्य महत्वाच्या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. म.न.पा. आयुक्त यांचे कार्यालयात तब्बल तीन तास चाललेल्या या मैराथन बैठकीत अनेक प्रकल्प संथगतीने सुरु असल्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. यावेळी कामात येत असलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात येईल, असा शब्द मनपा आयुक्त यांनी दिला.
उन्हाळ्यापूर्वी पूर्व नागपूर होणार टँकरमुक्त
पूर्व नागपुरात 100 कोटी रुपयाचे अमृत योजनेचे काम सुरु असून लकडगंज झोन अंतर्गत एकूण 95 कि.मी. पिण्याचे पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. आतापर्यंत 14.5 कि.मी. पाईपलाईन टाकलेली असून या लाईनवरून ताबडतोब कनेक्शन देण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. दररोज 1 कि.मी. अशी डेडलाईन असतांना देखील आतापर्यंत लाईन टाकण्यात आली नसल्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. तेव्हा उन्हाळ्यापूर्वी सर्व ठिकाणी पाईपलाईन टाकून लोकांना कनेक्शन देखील देण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व अनधिकृत ले आउट नियमित होणार
स्मार्ट सिटी बाबत चर्चा करीत असताना मौजा-भरतवाडा, पुनापूर, पारडी अंतर्गत सर्वच अनधिकृत ले आउट नियमित होणार असून याबाबत कारवाई सुद्धा सुरु झाली. या अनधिकृत ले आउट मधील प्लॉटधारकांना ना.सु.प्र.च्या नियमानुसार रु.56/- प्रती चौ.फुट प्रमाणेच डिमांड मिळणार असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी सांगितले. तसेच 40 टक्के जागेचा नियमाप्रमाणे मोबदला द्यावा, हि मागणीसुद्धा आमदार खोपडे यांनी रेटून धरली. तेव्हा याबाबत देखील सकारात्मक असून लवकरच याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे श्रो.सोनवणे यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त भांडेवाडी डंपिंग यार्ड समोरील रस्ता, क- वर्ग तीर्थक्षेत्र घोषित केलेले लक्ष्मीनारायण / शिव मंदिर, भवानी माता मंदिर, मुरलीधर मंदिर व पुरातन गणेश मंदिर, वाठोडा येथिल म.न.पा. च्या 10 एकर जागेवर बस टर्मिनल, 8 एकर जागेवर ट्राफिक चिल्ड्रन पार्क, 1 एकर जागेवर वाठोडा पो.स्टे. आदी विषयावर देखील चर्चा झाली. चर्चेतून अनेक सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, मनिषा कोठे, दिव्या धुरडे, हरीश दिकोंडवार, दिपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, मनिषा अतकरे, जयश्री रारोकर, वंदना भुरे, पांडुरंग मेहर, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, तालेवार साहेब, अमीन साहेब, राजू दिवटे, अनिल कोडापे, नितीन अरसपुरे, शरद पडोळे, सुनिल सूर्यवंशी, बंगीरवार, हुमणे, घरझाडे, दीक्षित, गेडाम, रेड्डी, दुपारे, मनिष सोनी व संबंधित विभागाचे अनेक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.