नागपूर: शहरातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नीरी, प्रादेशिक परिवहन विभागाचा संयुक्त विद्यमाने कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी दिली.
यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, प्रादेशिक परिवहन विभागाचे सुबोध देशपांडे, वायू प्रदूषण नियत्रंण मंडळाचे मुख्य अधिकारी पद्मा राव, ज्येष्ठ वैज्ञानिक संगीता गोयल, उपअभियंता आर.डब्ल्यू.राऊत, उपअभियंता (वाहतूक) ए.जी.बोधले, उपअभियंता राजेश दुफारे, उद्यान अधीक्षक डी.डी. मेंडूलकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर बैठकीत हवेतील प्रदूषणाचा स्तर सुधारण्यावर चर्चा करण्यात आली. अतिरिक्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर स्मार्ट सिटीअंतर्गत लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल. प्रदूषण कमी करण्यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठीच्या करावयाच्या उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाली. जनजागृतीपर जाहिरात स्मार्ट सिटीच्या एलईडी स्क्रीनवर लावण्यात यावे, असे निर्देश मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिले.
पेट्रोलमध्ये केरोसीन व इतर इंधन मिळवल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे या बैठकीत ठरले. रस्त्याच्या बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. रस्त्याच्या बांधकामाचा अहवाल त्वरित मागवण्याचे निर्देश मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी दिले.
बॅटरीवर चालणाऱ्या गाडी, ई-रिक्षा, ई-कार चा वापर करण्यात यावा, तसेत इथेनॉलवर चालणाऱ्या बसेसचा वापर करण्यात यावा, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यात यावा, अशी सूचना पद्मा राव यांनी केली. १५ दिवसानंतर या विषयांचा परत पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.