नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि केंद्र सरकार संचालित सात केंद्रीय विद्यालय नागपुरात सुरू होणार आहेत. मनपाच्या त्रीसदस्यीय समितीने केंद्रीय मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले.
नागपूर महानगरपालिका शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षण समितीचे सदस्य तथा नगरसेवक पिंटू झलके, राजेंद्र सोनकुसरे यांचा या त्रीसदस्यीय समितीत समावेश होता. समिती सदस्यांनी २ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सदर प्रस्तावासंदर्भात चर्चा केली. ना. गडकरी यांनी तातडीने यासंदर्भात ना. प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली.
यानंतर मनपाच्या त्रीसदस्यीय समितीने संसद भवनात ना. प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन नागपुरात सात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी दिले. त्यावर त्यांनी येत्या शैक्षणिक सत्रापासून केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचे आश्वासन समितीला दिल्याची माहिती शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.