मिळाली प्राणवायू सुविधा व औषधोपचार
नागपूर: शहरातील इंदोरा चौकात राहणार्या एका गरिब कुटुंबातील 24 दिवसांच्या हृदयाचा गंभीर त्रास असलेल्या नवजात अभ्रकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रेल्वे आरक्षण, प्राणवायू सुविधा व औषधोपचार उपलब्ध झाले. आता हा नवजात शिशु नवी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.
इंदोरा चौकात राहणारे प्रवीण सहारे यांना 5 मार्चला पुत्ररत्न प्राप्त झाले. जन्माच्या आधीच काढण्यात आलेल्या सोनोग्राफीतून नवजात शिशुला हृदयरोग असल्याचे लक्षात आले होते. शिशुच्या जन्मानंतर त्याला नेल्सन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून या शिशुच्या हृदयावर एक शस्त्रक्रिया केली. पण त्यानंतर शिशुला प्राणवायू द्यावा लागला. अधिक परिणामकारक औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी नेल्सनच्या डॉक्टरांनी रुग्णाला बंगलोर किंवा नवी दिल्ली येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी भरती करण्याचा सल्ला दिला. यामुळे आईवडिलांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांनी बंगलोर ऐवजी दिल्लीच्या एम्समध्ये नेण्याचे ठरविले आणि लागले तयारीला.
या दरम्यान शिशुचे वडील प्रवीण सहारे यांनी ना. गडकरी यांचे कार्यालयाशी संपर्क केला. एकूणच सर्व परिस्थिती पाहता ना. गडकरी यांच्या कार्यालयाने 31 मार्च रोजी तात्काळ प्रवासासाठी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क करून त्यांना सहारे यांच्या आरक्षणासंबंधी विनंती केली. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी गाडी नंबर 12441 मध्ये सहारे कुटुंबियांना आरक्षण दिले. या शिशुला नागपूर येथूनच प्राणवायू देत दिल्लीकडे नेण्यात आले. भोपाळ येथे पुन्हा प्राणवायूची व्यवस्था करणे आवश्यक होते. मध्य रेल्वेने बाळासाठी एनजीओच्या मदतीने भोपाळ स्थानकावर प्राणवायूच्या सिलेंडरची व्यवस्था करून मदत केली. तसेच रेल्वेच्या दोन डॉक्टरांनी या शिशुला तपासलेही.
दिल्लीत एम्समध्ये पोचल्यानंतर सहारे कुटुंबाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा ना. गडकरी यांच्या नागपूर कार्यालयाने दिल्ली कार्यालयाच्या माध्यमातून एम्सशी संपर्क साधून तेथील डॉक्टरांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर लगेच या शिशुला भरती करून घेण्यात आले आणि औषधोपचार सुरु झाला. आजही हा बाळ ऑक्सीजनवरच आहे. ना. गडकरी यांच्या कार्यालयाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नवजात शिशुला वेळेवर औषधोपचार उपलब्ध होऊ शकले.