नागपूर : सरकारने नुकतेच मराठा आरक्षणकर्त्यांच्या सर्वच मागण्या पूर्ण केल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकारने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा देता येणार नसल्याची भूमिका अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना मागील दाराने ओबीसीत समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे,अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. भुजबळ यांच्या या भूमिकेबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, भुजबळ यांच्या या भूमिकेशी आपण सहमत नाही. सरकारच्या अधिसूचनेबाबतच्या निर्णयामुळे ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मागील दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयांचा अभ्यास केला. यासंदर्भात अनेकांची मते जाणून घेतली. त्यानंतरच आपण भूमिका मांडत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशा ज्या लाखो नोंदी सरकारला सापडल्या आहेत, त्यातील जवळवास 99.99 टक्के नोंदी बऱ्याच जुन्या आहेत. त्यापैकी अनेकांजवळ आधीपासूनच जातीचे प्रमाणपत्र आहे. ज्यांच्या नोंदी असतील त्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदाच आहे. त्यामुळे सरकारने नवीन काही तरी केले, असे वाटत नसल्याचे डॉ.तायवाडे म्हणाले.